पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत तीन दिवसीय प्रदर्शन व विक्री

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालय अंतर्गत एमएसएमई विकास कार्यालय व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत तीन दिवसीय प्रदर्शनी व विक्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदशर्र्नाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. हे प्रदर्शन बुधवार (दि.१८) पर्यंत पाटीदार भवन, जालना रोड येथे होणार असून, दररोज दुपारी १२.३० ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. 
कारागीर व शिल्पकारांना सुवर्णसंधी
या प्रदर्शनात पारंपरिक कारागीर व शिल्पकारांना त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन व थेट विक्रीची संधी मिळणार आहे. यात सुतार, अस्त्रनिर्माते, लोहार, सुवर्णकार, कुंभार, मूर्तिकार, मोची, चटई व झाडू निर्माते, बाहुली व खेळणी निर्माते, मालाकार आदींचा सहभाग असणार आहे. तसेच ब्रँड नोंदणी, बौद्धिक संपदा हक्क व त्याचे फायदे याबाबत तीनही दिवस विशेष मार्गदर्शन करण्यात येणार असून स्वयंरोजगार कार्यशाळाही आयोजित केली जाणार आहे.
विविध संस्थांचा पाठिंबा
कार्यक्रमाला लघुउद्योग भारती, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, मराठवाडा लघु उद्योग विकास संघ, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर, सीएसएमएसएस छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आदी संस्थांचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रवींद्र साठे, सभापती, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांच्या हस्ते सोमवारी (दि.१६) दुपारी करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, इंडो जर्मन टूल रूम, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.